शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड : तपासातील हलगर्जीपणामुळे दोन पोलीस निरीक्षक निलंबित

0
Spread the love

सुनील अंबुलकर

जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील

बुलडाणा समाचार 

जळगाव जामोद, दि. ७ : बुलडाणा जिल्ह्यात गाजलेल्या शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणात तपासातील त्रुटी आणि हलगर्जीपणाबाबत अखेर दोन महत्त्वाच्या पोलीस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे पोलीस विभागातील जबाबदारी आणि उत्तरदायित्वाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

निलंबित करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार नितीन पाटील यांचा समावेश आहे. शिवानी कळमेकर प्रकरणाच्या तपासात सदोष कामकाज झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणात शिवानी कळमेकर हिची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढत बुलडाणा पोलिसांनी मध्यप्रदेशातील बापुराम कळमेकर आणि त्यांचा मुलगा अजय कळमेकर यांना अटक केली होती. मात्र नंतर हे कथित हत्याकांड बनावट असल्याचे समोर आल्यानंतर दोघांना तब्बल २२ दिवस विनाकारण तुरुंगवास भोगावा लागल्याची बाब उघड झाली.

दरम्यान, तपास प्रक्रियेत वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन असल्याचे पोलीस विभागाकडून वेळोवेळी सांगण्यात आले होते. त्यामुळे केवळ दोन पोलीस निरीक्षकांवर कारवाई करून प्रकरण संपुष्टात येऊ शकते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तपासाच्या प्रत्येक टप्प्यावर वरिष्ठांचे निर्देश आणि देखरेख असल्याचा दावा होत असताना अद्याप कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्यावर कारवाई झालेली नाही.

हे प्रकरण संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलीस महासंचालकांचा बुलडाणा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यानंतर तपासाशी संबंधित इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही जबाबदारी निश्चित करून कारवाई केली जाणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed