जगप्रसिद्ध लोणार सरोवरातील पाण्याच्या पातळीत मोठी वाढ, कमळजा देवीचं मंदिर १५ फूट पाण्याखाली

0
Spread the love

.             बुलडाणा समाचार 

गेल्या सहा महिन्यांपासून बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार खाऱ्या पाण्याच्या सरोवरातील पाण्याची पातळी सातत्याने वाढत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे ५२ हजार वर्षांपूर्वी उल्कापातातून निर्माण झालेल्या या अद्वितीय सरोवरात यापूर्वी कधीही न घडलेली परिस्थिती सध्या पाहायला मिळत आहे.

सरोवराच्या काठावर असलेले ऐतिहासिक व धार्मिक महत्त्वाचे कमळजा देवीचे मंदिर प्रथमच तब्बल १५ फूट पाण्याखाली गेले आहे. हे मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान असून आजवर कधीही पाण्याखाली गेले नव्हते. त्यामुळे नागरिकांमध्ये तसेच भाविकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

याआधी लोणार सरोवरात मासे आढळून आल्यानेही मोठी चर्चा झाली होती. खाऱ्या पाण्याच्या सरोवरात मासे कसे आढळतात, तसेच अचानक पाण्याची पातळी का आणि कुठून वाढत आहे, याबाबत अद्याप कोणतेही ठोस कारण समोर आलेले नाही.

लोणार सरोवराचा अभ्यास करण्यासाठी देश-विदेशातून शास्त्रज्ञ आणि पर्यटक येथे भेट देत असतात. मात्र सध्याच्या या गंभीर बदलांकडे संबंधित पुरातत्व विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या संपूर्ण घटनेवर सखोल वैज्ञानिक संशोधन होणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

लोणार खाऱ्या पाण्याचे सरोवर पुन्हा एकदा रहस्य आणि चर्चेचा विषय ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed