बुलढाण्याच्या सुपुत्राचे आंतरराष्ट्रीय यश; डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी यूकेतील जागतिक कीर्तीच्या राईटिंग्टन हॉस्पिटलमधून ऑर्थोपेडिक फेलोशिप पूर्ण केली
∨
बुलडाणा समाचार
जिल्ह्याचे सुपुत्र तसेच तरुण आणि तडफदार अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध पाटील यांनी युनायटेड किंगडम (यूके) येथील जगप्रसिद्ध राईटिंग्टन हॉस्पिटलमधून उच्चस्तरीय ऑर्थोपेडिक फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण करून जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात येत आहे.
सांधेप्रत्यारोपण शस्त्रक्रिया (Arthroplasty) क्षेत्रातील सर्वोच्च जागतिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राईटिंग्टन हॉस्पिटलला वैद्यकीय इतिहासात अत्यंत मानाचे स्थान आहे. आधुनिक हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेचे जनक मानले जाणारे सर जॉन चार्नली तसेच प्रख्यात सर्जन केविन हार्डींग यांसारख्या वैद्यकीय दिग्गजांनी याच संस्थेत संशोधन आणि नाविन्यपूर्ण कार्य केले आहे. अशा प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक संस्थेत प्रत्यक्ष प्रगत शस्त्रक्रियांचे प्रशिक्षण घेण्याचा दुर्मिळ मान डॉ. अनिरुद्ध पाटील यांना मिळाला.
फेलोशिपदरम्यान डॉ. पाटील यांनी क्लिष्ट सांधेबदल शस्त्रक्रिया, सांध्यांची पुनर्रचना (Joint Reconstruction) तसेच गुंतागुंतीच्या ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियांचे अत्याधुनिक प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. या कालावधीत त्यांनी आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपचारपद्धती आणि जागतिक दर्जाच्या शस्त्रक्रिया तंत्रांचा सखोल अभ्यास केला.
यूकेमधील या उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाचा आणि अनुभवाचा लाभ भविष्यात येथील रुग्णांना मिळणार असून अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात त्याचा मोठा उपयोग होणार आहे. बुलढाण्यासारख्या ग्रामीण भागातून पुढे येत जागतिक स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. अनिरुद्ध पाटील यांच्या या यशाचा जिल्हावासीयांना अभिमान वाटत असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
