जिल्ह्यात थंडीची प्रचंड लाट; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

0
Spread the love

.                  बुलडाणा समाचार 

बुलढाणा : उत्तरेकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांच्या प्रभावामुळे बुलढाणा जिल्ह्यात थंडीचे लोंढे उतरले असून गुलाबी थंडीने नागरिकांना गारठून टाकले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यातील किमान तापमानात तब्बल २ ते ३ अंशांनी घट नोंदविण्यात आली आहे. हवामान खात्याने आजपासून पुढील चार ते पाच दिवस जिल्ह्यात थंडीची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा दिला आहे.

कमी तापमानामुळे जिल्ह्याच्या आरोग्यावरही मोठा परिणाम होत असून सर्दी, ताप, खोकला यांसारख्या साथीच्या आजारांचे रुग्ण वाढत आहेत. विशेषत: लहान मुले आणि वृद्ध नागरिक यांच्यावर या थंडीचा अधिक परिणाम जाणवत असून त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आजारपणाची लक्षणे दिसताच तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचार घेण्याचे आवाहन वैद्यकीय प्रशासनाने केले आहे.

थंडीपासून बचाव करण्यासाठी जिल्हाभर ठिकठिकाणी शेकोट्या पेटवण्यात येत असून नागरिक उब मिळवण्यासाठी या शेकोट्यांभोवती गर्दी करताना दिसत आहेत. शहरांत स्वेटर्स, जॅकेट्स आणि हिवाळी कपड्यांच्या दुकानांनाही मोठी मागणी आहे. नागरिकांनी हिवाळी वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे चित्र अनेक बाजारपेठांमध्ये पाहायला मिळत आहे.

जिल्हाभर पसरलेल्या थंडीच्या या चादरीमुळे नागरिकांनी सतर्क राहून स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed