बुलढाणा : पुरवठा विभागाची सूचना – घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर केल्यास कडक कारवाईचा इशारा निलीमा उरकुडे निरीक्षण अधिकारी एक्शन मोडवर 

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

बुलढाणा, दि. १३ मार्च : सध्या जागतिक पातळीवर आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीमुळे भविष्यात अत्यावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच साठेबाजी व काळाबाजार होण्याचा धोका लक्षात घेता केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ (कलम ३) तसेच Maintenance of Production, Storage and Supply Order अंतर्गत दिनांक ९ मार्च २०२६ च्या पत्रकानुसार आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर व तालुक्यातील सर्व गॅस एजन्सी धारक, पेट्रोल पंप चालक तसेच हॉटेल, उपहारगृह, ढाबा मालक, व्यावसायिक आणि मंगल कार्यालय मालक यांनी घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर करू नये, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. संबंधित ठिकाणी घरगुती गॅसचा वापर आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा यांच्या सूचनेनुसार जिल्हा व तालुका स्तरावर दक्षता पथक स्थापन करण्यात आले आहे. तहसीलदार बुलढाणा यांच्या अध्यक्षतेखालील या पथकाद्वारे गॅस एजन्सी व पेट्रोल पंपांची तपासणी केली जाणार आहे. तपासणीदरम्यान कोणत्याही प्रकारची अनियमितता किंवा अफरातफर आढळल्यास जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ अंतर्गत कठोर कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याने नागरिकांनी कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार तथा निरीक्षण अधिकारी (पुरवठा विभाग) बुलढाणा यांनी केले आहे.

बुलढाणा तालुक्यातील तसेच शहरातील सर्व नागरिकांना याबाबत सूचित करण्यात येते की कोणत्याही प्रकारची गडबड किंवा घबराट निर्माण करू नये. गॅस सिलिंडरचा पुरेसा व योग्य साठा उपलब्ध करून ठेवण्यात आलेला आहे. त्यामुळे कोणत्याही अफवा किंवा काळाबाजार करणाऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नये.

शहरात शांतता व सुव्यवस्था कायम ठेवावी. तसेच काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा निलीमा उरकुडे निरीक्षण अधिकारी बुलडाणा यांनी दिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed