बुलढाणा : गुटका विक्री तात्काळ बंद करण्याची युवक काँग्रेसची मागणी


बुलडाणा समाचार
बुलढाणा, दि. 13 मार्च 2026 – शहरात शासनाने बंदी घातलेल्या गुटक्याची सर्रासपणे विक्री सुरू असल्याचा आरोप करत शहर युवक काँग्रेसच्या वतीने प्रशासनाला तक्रार अर्ज देण्यात आला आहे. युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख मुजाहिद शेख अहमद यांनी अन्न व औषध प्रशासन अधिकारी, जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक यांना हा अर्ज सादर केला.
अर्जात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा हे जिल्ह्याचे मुख्यालय असूनही येथे गुटक्याची खुलेआम विक्री होत आहे. विशेषतः गोळ्या-बिस्कीटच्या होलसेल दुकानांमधून मोठ्या प्रमाणात गुटका विकला जात असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशासनाच्या कार्यालयापासून अवघ्या १०० मीटर अंतरावरही गुटक्याची विक्री होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याबाबत प्रशासनाने तात्काळ कारवाई करून गुटक्याची विक्री बंद करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच ७ दिवसांच्या आत संबंधित दुकानांवर कारवाई न झाल्यास शहर युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच “गुटका फेक आंदोलन” करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात गुटका विक्रीवर तातडीने नियंत्रण आणून बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी विनंती युवक काँग्रेसने प्रशासनाला केली आहे.
