विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचा ग्राम घिर्णी येथे शुभारंभ

बुलडाणा समाचार
प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापुर :- संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न, गौरीशंकर सेवा समिती द्वारा संचालित विज्ञान महाविद्यालय, मलकापूर (कॉलेज कोड ३२२) येथील राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) विभागाच्या वतीने मलकापूर तालुक्यातील जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, दत्तकग्राम घीर्णी येथे दिनांक ३१ जानेवारी २०२६ ते ०७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित विशेष शिबिराचे उद्घाटन रविवार, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाले.
राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी मा. श्री मोरेशभाऊ महाजन, अध्यक्ष, गौरीशंकर सेवा समिती यांच्या हस्ते रेड रिबन कापून शिबिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. माच्या वर उपस्थित सर्व मान्यवरांनी सरस्वती माता आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमांचे पूजन केले. उपस्थित सर्व मान्यवरचे स्वागत विद्यार्थ्यांनी केले. उद्घाटन समारंभात जि. प. मराठी उच्च प्राथमिक शाळा, घीर्णी येथील मुख्याध्यापक श्री बघिले सर यांनी श्रमदान शिबिराचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले तसेच शाळेकडून आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाय. पी. पाटील यांनी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जबाबदारी व सामाजिक बांधिलकी निर्माण होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक रा. से. यो. क्षेत्रीय समन्वयक डॉ. देविदास दरेगावे यांनी शाश्वत विकास, पाणलोट व्यवस्थापन व पर्यावरण संवर्धन या विषयांवर सखोल मार्गदर्शन करत शिबिराच्या उद्दिष्टांची सविस्तर भूमिका मांडली व स्वयंसेवकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
प्रमुख अध्यक्ष म्हणून उपस्थित मा. श्री मोरेशभाऊ महाजन यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करत एकात्मिक बळ, संघभावना व राष्ट्रनिर्मितीत युवकांचे महत्त्वपूर्ण योगदान या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमास ग्रामपंचायत सरपंच प्रमिलाबाई चोपडे, शाळा समितीचे अध्यक्ष श्री रविभाऊ चव्हाण, विज्ञान महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. झोपे सर तसेच वरिष्ठ लिपिक श्री मधुकरभाऊ कोलते यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. राहुल निकम यांनी केले, तर कार्यक्रमाच्या शेवटी महिला रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. सी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रीय सेवा योजना (रा. से. यो.) च्या लक्ष्यगीताने करण्यात आली.
या उद्घाटन कार्यक्रमामुळे स्वयंसेवकांमध्ये उत्साह, शिस्त, सामाजिक जाणीव व एकोप्याचे वातावरण निर्माण झाले. स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध, उत्स्फूर्त व सक्रिय सहभागामुळे राष्ट्रीय सेवा योजना विशेष शिबिराचा उद्घाटनाचा दिवस अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.
