नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीवेळी कामगारांना भरपगारी सुट्टी

बुलडाणा समाचार
बुलढाणा, दि. 28 : जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, मंगळवार, दि. 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. नागरिकांना मतदानाचा संवैधानिक हक्क पार पाडता यावा यासाठी राज्य शासनाने या दिवशी सार्वजनिक सुट्टी घोषित केली आहे.
सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सांगितले की, जिल्ह्यातील 11 नगरपरिषदांच्या मतदान क्षेत्रातील सर्व कामगारांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक आहे. उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या शासन निर्णयानुसार, विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना—जसे कारखाने, दुकाने, हॉटेल्स व इतर व्यावसायिक ठिकाण येथील कामगार व कर्मचारी वर्गाला मतदानासाठी सुट्टी दिली जाणार आहे.
अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवसाची सुट्टी देणे शक्य नसल्यास, संबंधित आस्थापना मालकांनी किमान दोन ते तीन तासांची सवलत देऊन कामगारांना मतदानाची संधी मिळेल याची खबरदारी घ्यावी. मतदानासाठी सुट्टी किंवा सवलत न दिल्यास संबंधित आस्थापना धारकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
बुलडाणा जिल्ह्यातील सर्व मतदार कामगारांनी निर्बंधाविना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी देण्याचे आवाहन सरकारी कामगार अधिकारी म. तु. जाधव यांनी केले आहे.
