सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाला धोका

बुलडाणा समाचार
खामगांव प्रतिनिधी :– लहान मुलांच्या वार्डवर सुकले झाड, डायलिसिस जवळ झाडीत सापांचा धोका
रुग्णसेवक संघटनेने वैद्यकीय अधीक्षकांना दिला तक्रार अर्ज दि. 03 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2:15 वाजता येथील महात्मा ज्योतिबा फुले सामान्य रुग्णालयात रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशा अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत. याबाबत महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेने आज वैद्यकीय अधीक्षक डॉ. निलेश टापरे यांना लेखी तक्रार अर्ज सादर केला.
संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष सुरज एस. यादव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. 02/08/2026 रोजी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयाची प्रत्यक्ष पाहणी केली असता अत्यंत गंभीर परिस्थिती दिसून आली. याचे 22 फोटो पुरावे देखील अर्जासोबत जोडण्यात आले आहेत.
तक्रारीतील मुख्य मुद्दे:
1. वार्ड क्र.2 – लहान मुलांचा वार्ड : गेल्या 1 वर्षापासून सुकले मोठे झाड भिंतीवर पडले आहे. कोणत्याही क्षणी भिंत कोसळण्याचा धोका आहे.
2. डायलिसिस विभागाजवळ सापांचा धोका : डायलिसिस विभागाच्या भिंतीला व कंपाऊंडला लागून भरपूर दाट झाडे-झुडपे वाढलेली आहेत. त्याच्याच बाजूला काही अंतरावर प्रसूती वार्ड आहे. यापूर्वीही येथे विषारी साप निघाल्याच्या घटना घडल्या आहेत.
3. शिदोरी गृह परिसरात घाण पाणी पोलीस चौकीला लागून असलेल्या शिदोरी गृहाच्या बाहेरील नालीमधील घाण दुर्गंधीयुक्त पाणी मेन गेटच्या अवती भवती साचले आहे.* त्यामुळे रुग्णांच्या जेवणातून संसर्ग पसरण्याचा मोठा धोका आहे.
4. संपूर्ण रुग्णालयात अस्वच्छता ICU, SNCU, प्रसूती, OT, जनरल वार्डच्या खिडक्यांबाहेर गुडघ्यापर्यंत गवत आणि झुडपे वाढली आहेत.
5. वैद्यकीय कचरा* : जीवनरक्षक विभागांच्या बाहेर रिकाम्या सलाईन बॉटल आणि वैद्यकीय कचरा पडला आहे.
6. Bio-Medical Waste Rules चा भंग : PM Room च्या मागील भागात कचऱ्याचा ढीग असून मोकाट गायी तिथे चरत आहेत.
संघटनेची मागणी:
तक्रार अर्जात 24 तासांच्या आत वार्ड क्र.2 वरील सुकले झाड व हिरवी झाडे झूडपे काढून भिंत मोकळी करावी. तसेच 48 तासांच्या आत संपूर्ण रुग्णालय परिसराची स्वच्छता व झाडे-झुडपे तोडावीत. यास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
जर तातडीने कारवाई झाली नाही तर रुग्णांच्या हितासाठी संघटनेला लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशाराही अर्जात देण्यात आला आहे.
तक्रार अर्ज देताना उपस्थित:* सुरज एस. यादव – प्रदेश उपाध्यक्ष, रुपेश जुगलकिशोर कलंत्री, गौरव सुरेश कवटेकर, संदीप उत्तम कवटेकर, रामलाल ओंकार सोनोने, प्रदिप सुरेश शर्मा, नरेश सुभाष मसनेवार, चेतन धनराज कदम, अतुल ओंकार इंगळे, शेख सलीम शेख फरीद, संतोष बापूराव आटोळे. आदि
महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे पदाधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहे
