खामगाव : तासभराच्या जीवघेण्या रेस्क्यू ऑपरेशननंतर सपाट टाक्यात अडकलेल्या नंदीची सुखरूप सुटका

बुलडाणा समाचार
खामगाव, दि. ३ ऑगस्ट : शहरातील बारादरी परिसरातील अशोक गेस्ट हाऊसजवळ आज सकाळी घडलेल्या घटनेत एक बेवारस नंदी पाण्याच्या सपाट टाक्यात पडल्याने मोठी खळबळ उडाली. जवळपास एक तास चाललेल्या जीवघेण्या रेस्क्यू ऑपरेशननंतर एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनच्या गौसेवकांनी नंदीची सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, बारादरी येथील झुनझुनवाला यांच्या घराच्या कंपाऊंडचे गेट उघडे असल्याने सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास एक बेवारस नंदी आत शिरला. कंपाऊंडमधील पाण्याच्या टाक्यावर ठेवलेल्या पटल्याचा धाबा नंदीच्या वजनामुळे तुटला आणि तो थेट सिमेंटने पूर्ण घोटाई केलेल्या सपाट टाक्यात पडला.
टाक्याच्या आतील भिंतींवर शेवाळ साचल्याने नंदीचे पाय वारंवार घसरत होते. टाक्याची रचना पूर्णपणे सपाट असल्याने त्याला स्वतःहून बाहेर पडणे अशक्य झाले होते. घटनेची माहिती मिळताच एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनचे गौसेवक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
सूरजभैय्या यादव, गौरव कवटेकर, राहुल ठाकूर, नितीन चंदेल, पवन वानखडे, मोहन उगले, विलास क्षिरसागर, पियुष झुनझुनवाला, लाखा भाई तसेच इतर गौसेवकांनी जीवाची पर्वा न करता सुमारे एक तासाहून अधिक काळ अथक प्रयत्न केले. नंदीचे वजन अधिक असल्याने पहिल्या प्रयत्नात दोरी तुटली; मात्र गौसेवकांनी हार न मानता पुन्हा प्रयत्न करून नंदीला सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.
सुटका होताच नंदीने मोकळा श्वास घेतला आणि स्वतःच्या पायांनी तेथून निघून गेला. या धाडसी आणि चिकाटीच्या रेस्क्यूमुळे एका मुक्या जीवाचे प्राण वाचल्याने परिसरातील नागरिकांनी गौसेवकांचे कौतुक केले.
