⭕सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना एका लाखाच्या बदली नऊ लाख देऊ असे आमिष देणाऱ्या टोळीला आखरी ठोकल्याबेळ्या⭕

बुलडाणा समाचार
💥पोलिसांच्या चकमकीत एक आरोपी फरार….
प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर
मलकापूर: मलकापूर शहरात दिवसेंदिवस वाढत असलेल्या बनावट नोटांच्या रॅकेटविरोधात पोलिसांनी अखेर मोठी मोहीम सुरू करून धाडसी कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने सोमवारी (६ एप्रिल) दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास बसस्थानकाजवळील स्वराज्य बेकरी परिसरात सापळा रचला आणि सुमारे ९ लाख रुपयांच्या बनावट नोटांसह चार संशयितांना रंगेहाथ पकडले. पळून जाण्याच्या प्रयत्नात संशयितांची पोलिसांशी झटापट झाली, ज्यामध्ये पीएसआय अविनाश जयभाये किरकोळ जखमी झाले. मात्र, या प्रकरणातील एक संशयित पळून जाण्यात यशस्वी झाला.
मलकापूर आणि आसपासच्या परिसरात बनावट नोटांचे रॅकेट सक्रिय असल्याची माहिती मिळाल्यानंतर, एलसीबीने अत्यंत काळजीपूर्वक सापळा रचला. संशयित सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना जाळ्यात अडकवत असल्याची माहिती समोर आली होती. या टोळीने ‘एक लाख द्या, नऊ लाख घ्या’ असे आमिष दाखवून इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर बनावट नोटांचे बंडल दाखवून लोकांची फसवणूक करण्याची पद्धत अवलंबली होती. पोलिसांनी बनावट ग्राहक असल्याचे भासवून इन्स्टाग्रामवर संशयितांशी संपर्क साधला आणि वाटाघाटी केल्या, त्यानंतर संशयितांनी माल पोहोचवण्यासाठी मलकापूरला येण्याचे ठरवले. ठरलेल्या योजनेनुसार, संशयित बसस्थानकाजवळील स्वराज बेकरी परिसरात पोहोचताच एलसीबीच्या पथकाने त्यांना घेरले आणि पकडले. त्यांच्या ताब्यातून ५०० रुपयांच्या नोटांची १८ बंडले जप्त करण्यात आली. या बंडलमध्ये वरच्या बाजूला अस्सल नोट ठेवून आतमध्ये मोठ्या प्रमाणात बनावट नोटा ठेवण्यात आल्याचे आढळून आले.
दरम्यान, पकड टाळण्यासाठी आरोपींनी पोलिसांशी झटापट केली. त्यापैकी एका आरोपीने जवळील छोट्या चाकूने पीएसआय अविनाश अंबादास जायभाये यांच्यावर वार करण्याचाही प्रयत्न केला. या गोंधळात सागर तायडे हा आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणी अमोल रमेश गोरे (वय २५, रा. रमाई नगर), भरत मधुकर वानखेडे (वय २५, रा. रमाई नगर), अविनाश सुनील तायडे (वय २२, रा. रमाई नगर) आणि चेतन गुलाबराव पाटील (वय २५, रा. महालखेडा, ता. मुक्ताईनगर) या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपी सागर तायडे याचाही या गुन्ह्यात समावेश असून सर्वांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात पीएसआय अविनाश अंबादास जायभाये यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक गणेश गिरी करीत आहेत.
💥दरम्यान, या संपूर्ण रॅकेटला मलकापूरातीलच काही पोलिसांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे. त्यामुळेच शहरात बनावट नोटांचे जाळे दिवसेंदिवस वाढत असल्याची नागरिकांमध्ये कुजबुज आहे. कायद्याचे रक्षण करणाऱ्या खाकीवर काही मोजक्या लोकांच्या कृतीमुळे डाग लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ‘कुंपणच शेण खात आहे का?’ असा सवाल नागरिकांमध्ये उपस्थित होत असून या चर्चेतील ‘खाकी’मधील ते चेहरे कोण, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणात पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी लक्ष देण्याची गरज असल्याची भावना नागरिक व्यक्त करीत आहे.
