बुलडाण्यात साध्वी सृष्टीलताजींचे भव्य स्वागत; महिलांची स्कुटर रॅली आकर्षण, रामकथेचा शुभारं

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

बुलडाणा : सद्भावना सेवा समिती, बुलडाणा यांच्या वतीने दि. ७ एप्रिलपासून साध्वी सृष्टीलता रामायणीजी यांच्या रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २ ते ६ या वेळेत साध्वी सृष्टीलताजी आपल्या ओजस्वी वाणीमधून रामकथा सादर करणार आहेत. यासाठी त्या अयोध्याधाम (उत्तर प्रदेश) येथून शहरात दाखल झाल्या.

शहरात आगमन झाल्यानंतर दादावाडी येथे ए. आर. डी. देशलहरा परिवाराच्या वतीने त्यांचे पूजन व माल्यार्पण करून स्वागत करण्यात आले. सौ. अनिता देशलहरा यांनी साध्वीजींना मंदिर दर्शन घडविले. यावेळी जैन साध्वी भगवंत परमपूज्य पुष्पदंताश्री म.सा. व कन्यारत्नश्री म.स. यांचीही उपस्थिती होती. तसेच घनश्याम चोपडा व ललित चोपडा उपस्थित होते.

सद्भावना सेवा समितीचे अध्यक्ष राधेश्याम चांडक यांनी साध्वीजींचे स्वागत केल्यानंतर शहरात महिलांची स्कुटर रॅली व पुरुषांची बाईक रॅली काढण्यात आली. सौ. अंजली परांजपे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर साध्वीजी मार्बल हाऊस येथे पोहोचल्या, जिथे सौ. सितादेवी शर्मा व त्यांच्या परिवाराने पूजन केले.

यावर्षी सद्भावना सेवा समितीचे रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वर्ष असून अध्यक्षांचा अमृतमहोत्सवही साजरा होत असल्याने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या निमित्ताने ९ दिवसांच्या रामकथेच्या दरम्यान विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे व सहभाग प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

तसेच ‘तुलादान महादान’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये गुळ, साखर, धान्य व गौग्रास दान करण्याची संधी नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकलित साहित्याचा उपयोग गोसेवा व रामकथेच्या महाप्रसादासाठी केला जाणार आहे.

या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन उपाध्यक्ष राजेश देशलहरा, कार्याध्यक्ष चंपालाल शर्मा व सचिव प्रकाशचंद्र पाठक यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समितीचे पदाधिकारी तसेच महिला रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या सौ. अंजली परांजपे विशेष परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed