मूर्तिजापूरजवळ भीषण अपघात; बुलढाण्याच्या चालक व क्लीनरचा दुर्दैवी मृत्यू

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

बुलढाणा, 7 फेब्रुवारी :नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने निघालेल्या आयशर वाहनाचा अमरावती–अकोला राष्ट्रीय महामार्गावर मूर्तिजापूर तालुक्यातील कुरम गावाजवळ मध्यरात्री भीषण अपघात झाला. या अपघातात कॅबिनमध्ये अडकून बुलढाणा येथील चालक व क्लीनर अशा दोन तरुणांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे बुलढाणा शहरात शोककळा पसरली आहे.

प्राप्त माहितीनुसार, आयशर वाहन रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात जाऊन धडकल्याने वाहनातील संपूर्ण लोखंडी पाईप कॅबिनवर कोसळले. त्यामुळे कॅबिनमध्ये अडकलेल्या चालक व क्लीनरचा दबून जागीच मृत्यू झाला. अपघात नेमका कसा घडला, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

या अपघातात बुलढाणा येथील जोहर नगर भागात राहणारे अनीसोद्दीन रफीयोद्दीन काझी (वय 40 वर्षे) आणि रेहान नाजिम पठाण (वय 22 वर्षे) यांचा मृत्यू झाला आहे. हे दोघे नागपूरहून लोखंडी पाईप घेऊन आपल्या आयशर वाहनातून प्रवास करत होते. दरम्यान, रात्री 12 ते 1 वाजताच्या सुमारास कुरम (ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) येथे हा भीषण अपघात घडला.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी दुपारी वाहनातील लोखंडी पाईप हटविण्याचे काम सुरू होते.

दरम्यान, मृत दोन्ही तरुणांचे अंतिम संस्कार आज (शनिवारी) सायंकाळी 8.30 वाजता बुलढाणा येथील कब्रस्तानमध्ये होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed