चार लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा देशभक्तीपर सामूहिक कवायतीत सहभाग

बुलडाणा समाचार
राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायतीचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास बुलढाणा जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्ह्यातील तब्बल ४ लाख ३० हजार ७०४ विद्यार्थ्यांनी सामूहिक कवायतीत सहभाग नोंदवला. यासोबतच १७ हजार १३ शिक्षकांनी शाळा–शाळांमधून या कवायतीचे शिस्तबद्ध व दिमाखदार आयोजन केले.
जिल्ह्याचे मुख्य शासकीय कवायत संचलन प्रजासत्ताक दिनी सकाळी ९.३० वाजता बुलढाणा पोलीस कवायत मैदानावर पार पडले. या संचलनात बुलढाणा शहरातील सात शाळांमधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. अत्यंत शिस्तबद्ध व देखणारा हा सोहळा बुलढाणा शहरवासीयांनी अनुभवला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर सामूहिक कवायत सादर करण्यात आली.
या वेळी आमदार मा. संजय गायकवाड, नगराध्यक्ष मा. पूजाताई गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे विभागप्रमुख तसेच बुलढाणा शहरातील विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
