जळगाव जिल्ह्यातील आदिवासी भागात गोवर्धन देवबैल पूजनाचा पारंपरिक उत्सव साजरा

0
Spread the love

             बुलडाणा समाचार 

जळगाव जा. (ता. 24 ऑक्टोबर 2025) सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या चारबन, उमापूर, रसूलपूर आदी गावांमध्ये आदिवासी समाजाकडून पारंपरिक पद्धतीने गोवर्धन देवबैलाचा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.

दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी पोळा व दिवाळी एकत्र साजरी करण्याची परंपरा या भागात आजही कायम आहे. या दिवशी आदिवासी शेतकरी आपल्या बैलांना स्नान घालून त्यांच्या शिंगांना रंग देतात, अंगावर नवीन झूल व दोर चढवतात. बैलांना ठोंबरा खाऊ घातला जातो. काही ठिकाणी बैलांना शांत ठेवण्यासाठी दारूही पाजली जाते, अशी स्थानिक प्रथा आहे.

गावाजवळील जंगलातील झाडाखाली असलेल्या गोवर्धन देवबैलाच्या ठिकाणी मुखिया उदयसिंग पटेल, पठाण सिंग तसेच पुजारी यांच्या उपस्थितीत पूजन करण्यात आले. देवाजवळ अंडी, कुंकू, अगरबत्ती, गुलाल, नारळ अर्पण करण्यात आले. नव्या कपड्यांतील ग्रामस्थांनी देवबैलाला दोन ते तीन प्रदक्षिणा घातल्या. नारळ फोडून, फटाके फोडून उत्सवाचा समारोप करण्यात आला.

स्थानिक श्रद्धेनुसार, जंगलात चरायला गेलेल्या बैलांचे वाघ, बिबट्या व इतर वन्यप्राण्यांपासून रक्षण गोवर्धन देवबैल करतो, तसेच बैल आजारीही पडत नाहीत, अशी आदिवासी शेतकऱ्यांमध्ये दृढ श्रद्धा आहे.

ग्रामीण व आदिवासी संस्कृतीत जपलेली श्रद्धा आणि परंपरा आजही या भागात जिवंत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed