खामगाव (जि. बुलढाणा) : बिरादर-ए-वतनसाठी रमजान परिचय व इफ्तार मेळाव्याचे आयोजन

0
Spread the love

                बुलडाणा समाचार 

खामगाव येथील जिया कॉलनी मशिदीत २७ फेब्रुवारी २०२६ रोजी जमात-ए-इस्लामी हिंद तर्फे बिरादर-ए-वतनसाठी ‘मशिद परिचय व इफ्तार पार्टी’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विविध समाजघटकांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी औरंगाबाद येथील प्रमुख वक्ते इंजि. वाजिद कादरी प्रमुख उपस्थित होते. तसेच जमात-ए-इस्लामी हिंदचे प्रमुख जफर उबैद अन्सारी, नगरसेवक मोहम्मद ईसा, सामाजिक कार्यकर्ते शोहरत खान, ज्येष्ठ पत्रकार मोहम्मद फारूक, उमैर अहमद खान, आर्किटेक्ट अरशद नदीम आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.

बिरादर-ए-वतन आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत इफ्तार केला. त्यानंतर मुस्लिम बांधवांनी मगरिबची नमाज अदा केली. कार्यक्रमाची सुरुवात हाफिज अतिक उर रहमान यांनी कुरआन पठणाने केली. प्रा. सोहेल फुरकान यांनी त्याचा मराठी अनुवाद सादर केला.

प्रमुख वक्ते इंजि. वाजिद कादरी यांनी ‘तौहीद, रिसालत आणि आखिरत’ या विषयांवर मराठीत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच रमजान महिन्याचे महत्त्व व त्यामागील उद्देश प्रभावी उदाहरणांसह स्पष्ट केला. उपस्थित मान्यवरांनी त्यांचे भाषण शांतपणे ऐकले. त्यांच्या विचारांनी बिरादर-ए-वतन विशेष प्रभावित झाले.

या प्रसंगी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत अशा कार्यक्रमांची आजच्या काळात गरज असल्याचे नमूद केले. परस्परांतील भाईचारा व सलोखा वाढवण्यासाठी असे उपक्रम उपयुक्त ठरतात, असे मत त्यांनी व्यक्त केले आणि जमातच्या या पुढाकाराचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सोहेल फुरकान यांनी केले, तर आभार प्रदर्शन जफर उबैद अन्सारी यांनी मानले. कार्यक्रमादरम्यान मशिदीसमोर मोफत पुस्तक प्रदर्शन स्टॉलही लावण्यात आला होता. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जमात-ए-इस्लामी हिंद खामगाव आणि एसआयओच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed