बुलढाण्यात खळबळ! एकाच वर्गातील दोन मित्रांची तीन दिवसांत आत्महत्या; घातपाताचा संशय?

बुलडाणा समाचार
बुलढाणा शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. भारत विद्यालयातील आठव्या वर्गात शिकणाऱ्या दोन जिवलग मित्रांनी अवघ्या तीन दिवसांच्या अंतराने आत्महत्या केल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नमन राऊत याच्या आत्महत्येचा धक्का शमतो न शमतो, तोच त्याचा वर्गमित्र अथर्व राणे यानेही टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
अँकर :-बुलढाणा शहरात गेल्या तीन दिवसांपासून भीती आणि चिंतेचे वातावरण आहे. तीन दिवसांपूर्वी भारत विद्यालयातील आठव्या वर्गातील नमन अरुण राऊत या विद्यार्थ्याने आत्महत्या केली होती. इतक्या लहान वयात नमनने असे पाऊल का उचलले, या धक्क्यातून त्याचे कुटुंब सावरलेही नव्हते, तोच आज पुन्हा एका मृत्यूची बातमी धडकली.
नमनचा वर्गमित्र आणि त्याचा जवळचा सोबती अथर्व वैभव राणे यानेही आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास लावून आपली जीवनयात्रा संपवली. अथर्व हा सुंदरखेड येथील पाण्याच्या टाकीजवळ राहत होता, त्याचे वडील पोलीस दलात कार्यरत आहेत.
घटनेचा तपशील:
अथर्व आज नेहमीप्रमाणे शाळेतून घरी परतला होता.
सायंकाळी ५ वाजता त्याने गळफास घेतल्याचे लक्षात येताच कुटुंबाने त्याला तातडीने खाली उतरवले.
त्यावेळी त्याच्या शरीरात काही प्रमाणात हालचाल जाणवत होती, म्हणून त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलवण्यात आले.
डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान १४ वर्षीय अथर्वचा मृत्यू झाला.
एकाच वर्गातील दोन मित्रांनी लागोपाठ आत्महत्या केल्याने आता अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
या दोन्ही आत्महत्यांचे एकमेकांशी काही कनेक्शन आहे का?
या निष्पाप मुलांना कोणी ब्लॅकमेल तर करत नव्हते?
अशा कुठल्या दबावाखाली ही मुले होती, ज्याचा थांगपत्ता पालकांनाही लागला नाही?
नमनच्या आत्महत्येचे गूढ अद्याप कायम असतानाच अथर्वच्या जाण्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन या मृत्यूंमागचा मुख्य दुवा शोधणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे.
