मुलीच्या शिक्षणासाठी आणलेले ५ लाख रुपये चोरणारा आंतरराज्यीय चोरटा जेरबंद

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय कामगिरी

मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाची फी भरण्यासाठी आणलेले तब्बल ५ लाख रुपये चोरणाऱ्या आंतरराज्यीय बॅग लिफ्टरला बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कर्नाटक राज्यातील शिवमोगा येथून अटक केली आहे. आरोपीकडून संपूर्ण रक्कम हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

दि. १६ सप्टेंबर २०२५ रोजी नितीन जिजेबा पहाड (रा. रिसोड, जि. वाशिम) हे त्यांची मुलगी श्रुती हिचे बुलढाणा येथील राजश्री शाहू कॉलेजमध्ये बी.ए.एम.एस. अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित झाल्याने एसबीआय शाखा मेहकर येथून ५ लाख रुपये काढून कारने बुलढाणा येथे आले होते. कॉलेज परिसरात कार पार्क करून ते फी भरण्यासाठी आत गेले असता अज्ञात आरोपींनी कारचा काच फोडून त्यातील रोकड चोरून नेली होती.

या प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८०५/२५ अंतर्गत कलम ३०५ (C), ३(५) बीएनएस २०२३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी शेतकरी असल्याने ही रक्कम त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची होती व या घटनेमुळे त्यांना मोठा आर्थिक धक्का बसला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले. पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू ठेवला.

तपासादरम्यान आरोपी हे सराईत आंतरराज्यीय बॅग लिफ्टर असून ते कर्नाटकातील शिवमोगा शहरात वास्तव्यास असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने शिवमोगा येथे सलग पाच दिवस शोध मोहीम राबवून मुख्य आरोपी सुनिल ऊर्फ बालू रामु बोवी (वय ३२, रा. केशवपूरा, भद्रावती, जि. शिवमोगा) याला पेस कॉलेज परिसरातून स्थानिक पोलिसांच्या मदतीने अटक केली. चौकशीत आरोपीने हा गुन्हा भाऊ विष्णु रामु बोवी याच्यासोबत केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले संपूर्ण ५ लाख रुपये जप्त करण्यात आले.

सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध राज्यांत बॅग लिफ्टिंग व ग्लास ब्रेकिंगचे अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी आरोपीला बुलढाणा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक श्रेणीक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर, पोउपनि अविनाश जायभाये, पोहेकॉ दिपक लेकुरवाळे, चाँद शेख, गणेश पाटील, पोकॉ गजानन गोरले तसेच टीएडब्ल्यू पथकातील पोहेकॉ राजू आडवे, पवन मखमले, ऋषी खंडेराव यांनी यशस्वीपणे पार पाडली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed