अतिवृष्टीमुळे सानोटी परिसरातील शेतजमीन खरडून; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बुलडाणा समाचार
यावर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सानोटी परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतजमीन पूर्णपणे खरडून गेली असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.
या परिसरातील अनेक शेतकऱ्यांची शेती उपयोगात न येण्यासारखी झाली असून सरकारकडून अपेक्षित नुकसानभरपाई अद्याप मिळालेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरडून गेलेल्या जमिनींसाठी पूर्ण नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सानोटी परिसरातील शेतकऱ्यांना ही मदत अजूनपर्यंत मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी संबंधित शेतकऱ्यांनी मेहकर तहसील कार्यालयात तहसीलदार तसेच कृषी अधिकाऱ्यांना निवेदने दिली होती. मात्र, अधिकारी केवळ उडवा-उडवीची उत्तरे देत असून प्रत्यक्षात कोणतीही मदत मिळत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज सानोटी परिसरातील शेतकऱ्यांनी बुलढाणा येथे जाऊन जिल्हाधिकारी यांना निवेदन देत तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या या मागणीची प्रशासनाकडून दखल घेतली जाईल का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
