मलकापूर शहरात दहशत माजवणारा कुख्यात आरोपी आरिफ खानवर एमपीडीए अंतर्गत पोलिसांची धडक कारवाई

बुलडाणा समाचार
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या आहेत त्या टोळ्यांमुळे समाजांमुळे मध्ये भीतीच वातावरण निर्माण करून स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे तसाच काहीसा प्रकार विदर्भाच्या प्रवेशद्वारी मलकापूर येथे घडत होता त्यानिमित्त सविस्तर माहिती अशी की, मलकापूर शहरात सातत्याने दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात आरोपी आरिफ खान उर्फ खेबड्या कौसर खान याच्यावर अखेर महाराष्ट्र झोपडपट्टीदादा प्रतिबंधक कायदा (एमपीडीए) अंतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. मलकापूर शहर पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावास जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली असून आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
आरिफ खान (वय २४, रा. माळीपुरा, मलकापूर) हा गेल्या २०२३ पासून गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय असून त्याच्यावर मलकापूर शहर पोलीस ठाण्यात मारहाण, जीवघेणा हल्ला, शस्त्रांचा वापर, दहशत निर्माण करणे, सार्वजनिक शांततेचा भंग अशा गंभीर स्वरूपाचे एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. त्याच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. नागरिक उघडपणे तक्रार देण्यासही घाबरत असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती. यापूर्वी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असतानाही त्याच्या वर्तनात कोणताही सुधार झाला नाही. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करणे आवश्यक असल्याचा अहवाल मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सादर केला.
हा प्रस्ताव गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक वारे यांच्या सूचनेनुसार तयार करून पोलीस अधीक्षक निलेश तांबे (बुलढाणा) यांच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी प्रस्तावाचे अवलोकन करून तो मंजूर केला आणि आरोपी आरिफ खान याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले. सदर कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. प्रत्यक्ष अंमलबजावणीमध्ये पोलीस निरीक्षक गणेश गिरी, स.पो.नि. दीपक वारे, पोलीस अंमलदार आसिफ शेख (311), योगेश तायडे (2654), संतोष कुमावत (1013), प्रविण गवई (2732), नवल राठोड (1346) व आनंद माने (1254) यांनी सहभाग घेतला. या कठोर कारवाईमुळे मलकापूर शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
