30 किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत हर्ष गाढे प्रथम

बुलडाणा समाचार
बुलढाणा : बुलढाणा सायकलिंग क्लबतर्फे आयोजित ३० किलोमीटर सायकलिंग स्पर्धेत भारत विद्यालयाचा इयत्ता नववीचा विद्यार्थी हर्ष गाढे याने प्रथम क्रमांक पटकावीत जिल्ह्याचा मान वाढविला. दिनांक ५ डिसेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या हस्ते हर्षला पारितोषिक प्रदान करण्यात आले.
ही स्पर्धा शनिवारी सकाळी सुमारे ६.३० वाजता जिजामाता क्रीडा संकुल, बुलढाणा येथून सुरू झाली. स्पर्धकांनी जिजामाता क्रीडा संकुल येथून प्रस्थान करत संगम चौक धाड नाका कोलवड हातडी चिखला या मार्गावरून पुन्हा जिजामाता क्रीडा संकुल येथे परत येत स्पर्धेचा समारोप केला.
स्पर्धेनंतर आयोजित बक्षीस वितरण सोहळ्यात पुरुष व महिला गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात आली. हर्ष गाढे याला प्रथम क्रमांक मिळाल्याने त्याचा सत्कार पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला. बुलढाणा सायकलिंग क्लबच्या वतीने आयोजित ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
