खामगाव एमआयडीसीत एलपीजी गॅस गळतीवरील भव्य मॉकड्रिल यशस्वी; आपत्ती व्यवस्थापनाची सज्जता सिद्ध

बुलडाणा समाचार
बुलढाणा, दि. ९: औद्योगिक क्षेत्रात उद्भवणाऱ्या संभाव्य रासायनिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन किती सज्ज आहे, याची प्रात्यक्षिक झलक आज खामगाव एमआयडीसी येथे पाहायला मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार आणि निवासी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वन एशिया नेटवर्क इंडिया प्रा. लि.’ येथे एलपीजी गॅस गळती संदर्भात भव्य मॉकड्रिल यशस्वीरित्या पार पडली.
दुपारी ११:३० वाजता कंपनीच्या टँकर लोडिंग परिसरात गॅस गळती झाल्याचा काल्पनिक प्रसंग निर्माण करण्यात आला. गळतीची माहिती मिळताच कंपनी प्रशासनाने तातडीने जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. काही मिनिटांतच विविध शासकीय यंत्रणा घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करण्यात आले.
या मोहिमेचे समन्वयन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक अमर भोगे यांनी केले. अग्निशमन अधिकारी नागेश रोठे यांच्या नेतृत्वाखाली अग्निशमन पथकाने ‘वॉटर कर्टन’ तयार करून गॅसचा प्रसार नियंत्रित केला. पोलीस निरीक्षक सुरेंद्र अहेरकर यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात नाकेबंदी करण्यात आली, तर संभाव्य धोका टाळण्यासाठी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला.
कंपनीच्या आपत्कालीन आराखड्यानुसार सायरन वाजवून कर्मचाऱ्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. या सरावाचे निरीक्षण विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी केले आणि सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्य करत उत्कृष्ट प्रतिसाद दिला.
या सरावाचा मुख्य उद्देश म्हणजे एलपीजी गॅस गळतीसारख्या गंभीर परिस्थितीत विविध यंत्रणांमधील समन्वय आणि प्रतिसाद वेळ तपासणे हा होता. प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी गोंधळ टाळून, जीवित व वित्तहानी कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कशा राबवाव्यात, याचे प्रशिक्षण या माध्यमातून देण्यात आले.
या यशस्वी मॉकड्रिलमुळे खामगाव औद्योगिक परिसरातील सुरक्षिततेचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. कार्यक्रमाच्या शेवटी ‘वन एशिया नेटवर्क’च्या वतीने सर्व सहभागी यंत्रणांचे आभार मानण्यात आले.
