लोणार येथे ७ एप्रिलला भव्य योग महोत्सव; हजारो योगसाधकांचा सहभाग अपेक्षित

बुलडाणा समाचार
आंतरराष्ट्रीय योग दिनाला अवघे ७५ दिवस उरले असताना योगाचा व्यापक प्रसार व्हावा या उद्देशाने आयुष मंत्रालयाच्या वतीने ७ एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील जागतिक ख्यातीप्राप्त लोणार सरोवर येथे भव्य योग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले.
बुलढाणा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. योग साधना ही भारतीय संस्कृतीतील एक प्राचीन आणि समृद्ध परंपरा असून ती केवळ व्यायाम नसून शरीर, मन आणि आत्मा यांच्यात संतुलन साधणारी जीवनशैली आहे, असे त्यांनी सांगितले. आज योगाचा जागतिक स्तरावरही मोठ्या प्रमाणात स्वीकार होत आहे.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत २१ जून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला १७५ देशांचा पाठिंबा मिळाला आणि डिसेंबर २०१४ मध्ये त्यास मान्यता देण्यात आली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. यावर्षी २१ जून २०२६ रोजी १२वा योग दिन साजरा केला जाणार आहे.
या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या वतीने ‘१०० दिवस योग महोत्सव-२०२६’ उपक्रम राबविण्यात येत असून त्यातील दुसरा ‘७५ दिवसांचा काऊंटडाउन’ कार्यक्रम ७ एप्रिल रोजी लोणार येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात पार पडणार आहे.
या कार्यक्रमात सुमारे ७ हजारांहून अधिक योगसाधक सहभागी होण्याची अपेक्षा आहे. एकाच वेळी त्रिकोणासन करणाऱ्या सर्वाधिक लोकांचा विक्रम प्रस्थापित करून ‘एशियन बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
या योग महोत्सवात इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन, योग विद्या गुरुकुल, क्रीडा भारती, पतंजली योग संस्थान, आर्ट ऑफ लिव्हिंग, स्थानिक महिला बचत गट, शालेय विद्यार्थी तसेच आयुष विभागातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
पत्रकार परिषदेला मुरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थानचे निदेशक डॉ. काशिनाथ समघंडी व कार्यक्रम अधिकारी डॉ. ईश्वर आचार्य उपस्थित होते.
