धाड पोलिसांची कारवाई: बकऱ्या चोरी करणारे दोन आरोपी जेरबंद

बुलडाणा समाचार
बुलढाणा : प्रतिनिधी मतीन जमादार धाड. धाड.पोलीस स्टेशन हद्दीसह जाफराबाद, माव्होरा, सिल्लोड, भोकरदन आणि धावडा परिसरात काही दिवसांपासून चारचाकी वाहनाचा वापर करून बकऱ्या चोरीच्या घटना वाढल्या होत्या. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी आरोपींवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
दि. ११ मार्च २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास एमएच-१४ क्रमांकाची सिल्व्हर रंगाची होंडा सिटी कार धाड गावात संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे सतर्क नागरिक फैयाज सौदागर यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी वाहनाचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना पाहून आरोपींनी कार भरधाव वेगाने बुलढाणा शहराच्या दिशेने पळवली. सपोनि प्रताप भोस, दामिनी पथक आणि पोलीस मित्रांच्या मदतीने सागवन गावाजवळ धाड-बुलढाणा रोडवर तात्काळ नाकाबंदी करण्यात आली. पोलिसांच्या पाठलाग आणि नाकाबंदीमुळे आरोपींची होंडा सिटी कार सागवन गावाजवळ अडवण्यात आली.
पोलिसांनी दोन्ही संशयितांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी आपली नावे शेख फिरोज शेख लियाकत (रा. वडाळा, नाशिक) आणि आरिफ अब्दुल सिद्दीकी शेख (रा. माहीम झोपडपट्टी, माहीम, मुंबई) अशी सांगितली.
कारची झडती घेतली असता त्यामध्ये सुतळीने तोंड बांधलेल्या चार बकऱ्या, सुतळीचा गठ्ठा, मक्याचे दाणे आणि एमएच-१५ क्रमांकाची आणखी एक नंबर प्लेट असा एकूण अंदाजे ३ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिस चौकशीत आरोपींनी चार बकऱ्यांपैकी एक बकरी धाड येथून तर उर्वरित तीन बकऱ्या भराडी (सिल्लोड ग्रामीण, छत्रपती संभाजीनगर) येथून चोरी केल्याची कबुली दिली. तसेच बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन हद्दीत यापूर्वीही अनेक ठिकाणी बकऱ्या चोरी केल्याचे त्यांनी कबूल केले आहे.
ही कारवाई बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील आणि स्थागुशा पोलीस निरीक्षक सुनील अंमुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रताप दत्तात्रय भोस, पोउपनि परमेश्वर केंद्रे, पोहवा रविंद्र बहऱ्हाटे, पोहवा श्रीकृष्ण चव्हाण, पोशि इब्राहीम पठाण, पोशि राजू माळी तसेच दामिनी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
