जळगाव जामोद येथील शिक्षिकेचा अपघाती मृत्यू नसून पतीनेच रचलेला कट; सुपारी देऊन पत्नीचा जीवनप्रवास संपवल्याचे उघड

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर 

बुलढाणा जिल्ह्यात एका शिक्षिकेचा झालेला अपघाती मृत्यू हा नैसर्गिक अपघात नसून, तो तिच्या पतीनेच रचलेला एक भयानक कट असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून, पोलिसांनी या प्रकरणी मुख्य सूत्रधार असलेल्या पतीसह एका वाहन चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पातुर्डा येथील रहिवासी असलेल्या वृषाली प्रकाश गावंडे (वय ३७ वर्षे) या पिंपळगाव काळे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या. २ मार्च रोजी कवठळ नजीक त्यांचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला होता. सुरुवातीला ही घटना केवळ एक दुर्दैवी अपघात वाटत होती. मात्र, मृताचा भाऊ सुमित डोसे यांनी या घटनेबद्दल संशय व्यक्त करत हा घातपात असावा, अशी तक्रार पोलिसांकडे केली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास केला असता धक्कादायक वास्तव समोर आले. वृषाली यांचे पती प्रकाश अनंत गावंडे (वय ३७ वर्षे) यांच्यासोबत त्यांचे घरगुती कारणावरून सातत्याने वाद होत असत. या वादातूनच प्रकाश गावंडे याने आपल्या पत्नीला कायमचे दूर करण्याचा कट रचला होता. या कामासाठी त्याने आपला मित्र मंगेश चौहूलकर (रा. पातुर्डा) याच्या मदतीने एका वाहन चालकाला सुपारी दिली होती.

घटनेच्या दिवशी, वृषाली या त्यांच्या स्कूटरने (क्रमांक MH 28 AL 58 15) जात असताना, ‘टाटा छोटा हत्ती’ (क्रमांक MH 28 BB 57 53) या मालवाहू वाहनाचा चालक मनीष नारायण सिंग सूर्यवंशी याने त्यांच्या गाडीला मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की त्यात वृषाली यांचा मृत्यू झाला. तपासात असे निष्पन्न झाले की, ही धडक मुद्दाम मारण्यासाठी वाहन चालकाला १ लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती.

जळगाव जामोद पोलिसांनी या प्रकरणात वेगाने सूत्रे हलवत पती प्रकाश अनंत गावंडे आणि वाहन चालक मनीष सूर्यवंशी या दोघांना अटक केली आहे. मध्यस्थी करणारा मंगेश चौहूलकर अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपींना न्यायालयाने ९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या संपूर्ण कारवाईचे मार्गदर्शन पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी केले असून पोलीस उपनिरीक्षक स्नेहा शेंडगे पुढील तपास

करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed